वणी टाईम्स न्युज : अवैध रेती वाहतुकीसोबत महसूल विभागाने आता अवैध रेती साठवणूक विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी शहरातील साई नगरीला लागून गुप्ता लेआऊट येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेली तब्बल 25 ब्रास रेती ग्राम महसूल अधिकारी सुनील उराडे यांनी जप्त केली. जप्त केलेली रेती घरकुल योजना लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार गुप्ता लेआऊट येथे अवैधरीत्या 5 ते 6 ट्रक रेतीसाठा असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. माहिती वरून ग्राम महसूल अधिकारी सुनील उराडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता लेआऊट मधील सिमेंट रस्त्यावर व ठिकठिकाणी रेतीचे ढीग पडून दिसले. रेती साठ्याचा मालकी हक्काबाबत विचारणा केली असता कोणीही समोर आले नाही. त्यामुळे सदर रेतीसाठा बेवारस असल्याची खात्री पटवून त्यांनी संपूर्ण रेती साठ्याचा जप्ती पंचनामा करुन शासन जमा केली.
बेवारस रेती साठ्याबाबत ग्रा. म. अधिकारी सुनील उराडे यांना विचारणा केली असता जप्त केलेली रेती ही शनिवारी घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच यापुढेही महसूल विभागाकडून शहरातील बेवारस रेती साठाविरुद्ध कारवाई सूरु राहणार असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.










