वणी टाईम्स न्युज : झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठी मुकुटबन ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिल कुंटावार यांच्यावर मुकुटबन पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम (एट्रॉसिटी) चा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुकुटबन ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मीना जगदीश आरमूरवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार फिर्यादी ह्या मागील 4 वर्षापासून मुकुटबन ग्राम पंचायतीच्या सरपंच आहेत. तर उपसरपंच म्हणून अनिल राजेश्वर कुंटावार आहेत. दिनांक 30 मे रोजी 11 वाजता मुकुटबन ग्राम पंचायत येथे मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरम अभावी सभा तहकूब करण्यात आली. सरपंच मीना आरमूरवार ग्रा. पं. कार्यालयातून बाहेर निघताना उपसरपंच अनिल कुंटावार यांनी एका शिफारस पत्रावर सही मागितली. फिर्यादी यांनी सही करण्यास नकार दिली.
त्यामुळे उप सरपंच अनिल कुंटावार यांनी रागाने त्याला ‘ग्राम पंचायत तुझ्या बापाची आहे का ?’ तुझी लायकी आहे का सरपंच पदावर बसण्याची, असे सांगून सर्वांसमोर त्यांचा अपमान केला. तसेच फिर्यादी महिला सरपंच यास जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली. शिवाय जीवे मारण्याची धमकी देत मारण्यासाठी अंगावर धावून आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीवरून मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये गैर अर्जदार उप सरपंच अनिल राजेश्वर कुंटावार, राह. मुकुटबन विरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम कलम 3(1)(r), (1)(s), 3(2)(va) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे करीत आहे.










