वणी टाईम्स न्युज | वणी तालुक्यातील मोहदा परिसरात एका गिट्टी क्रशर प्लांटवर झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुदास मदनदास दास (53), रा. मोहदा ता. वणी हे जय हनुमान ड्रिलिंग अँड ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून कार्यरत होते. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी रात्रीच्या सुमारास ते मामीडवार यांचे गजानन कन्स्ट्रक्शनच्या क्रशर प्लांटवर ड्युटीसाठी गेले होते.
दरम्यान, रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या सुपरवायझरकडून त्यांच्या नातेवाईकांना माहिती मिळाली की, विष्णुदास दास हे ट्रक क्रमांक MH-29-CF-2216 जवळ जखमी अवस्थेत पडलेले आहेत. तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
पुन्हा श्रेयवादाची ठिणगी; फिल्टर प्लांट निधीवरून आजी-माजी आमदार आमनेसामने
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, संबंधित ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन रिव्हर्स घेताना मागील परिस्थिती न पाहता विष्णुदास दास यांना धडक दिली. धडकेनंतर ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचे सावत्र पुत्र समरसिंग उईके (वय 33) यांनी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, संबंधित ट्रक चालकाविरुद्ध कलम 106 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर ठाणेदार API संतोष मनवर यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.










