वणी टाईम्स न्युज : कुलंट बदलविण्यासाठी गॅरेज मध्ये नेलेल्या कार मधून 7 लाखाचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याची घटना 28 मे रोजी घडली होती. सदर घटनेबाबत फिर्यादी रविंद्र रामदास राजुरकर (49), रा. मोहदा, पोस्ट वेळाबाई यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत गॅरेज मधील मेकॅनिक यांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला होता. तक्रार मिळताच पोलिसांनी संशयती मेकॅनिक शेख तनवीर शेख अजीज (20) रा. रंगनाथ नगर वणी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला आरोपीने तो मी नव्हेच ची भूमिका घेतली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीने लपवून ठेवलेले ठिकाणांहून पोलिसांनी चोरलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले. तक्रार दाखल होताच अवघ्या 2 तासात गुन्हा उघड करून संपूर्ण मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाला.

तक्रारीनुसार, फिर्यादी रविंद्र रामदास राजुरकर हे आपल्या पत्नीसह व दोन मुलांसह राहून शेती करतात. 24 मे रोजी त्यांच्या पत्नी वर्षा यांचे माहेरी लग्न समारंभासाठी भद्रावती, चंद्रपूर येथे गेल्या होत्या. 28 मे रोजी दुपारी 2 वाजता ते पत्नीला आणण्यासाठी आपल्या टाटा नेक्सॉन कार क्र. MH29 BP7092 ने भद्रावती जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी घरातून आपल्या पत्नीचे 3 तोळे सोन्याच्या दोन बांगड्या व सुमारे दीड तोळ्याचा चपला कंठी हार असे एकूण 7.5 तोळे सोन्याचे दागिने एका पाकिटात ठेवले व कारच्या ड्रॉवरमध्ये सुरक्षित ठेवले होते.
मात्र, रस्त्यात वणी शहरातील मुकुटबन रोडवरील नायरा पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या मिर्झा कार सर्विसिंग सेंटरमध्ये त्यांच्या कारचे कुलंट टाकण्यासाठी थांबले. गॅरेज मालक झाकीर मिर्झा याने कार मॅकेनिक तन्वीर शेख शेख अजिज याच्या ताब्यात दिली. तन्वीरने कार रॅम्पवर चढवून पंधरा मिनिटांत कारची सर्विसिंग पूर्ण केली आणि राजुरकर यांना परत दिली. भद्रावती गाठल्यानंतर राजुरकर यांनी कारच्या ड्रॉवरमधील पाकीट तपासले असता, सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वणीला परत येऊन गॅरेज मालक व मॅकेनिकला विचारणा केली, मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.
त्यांनी अखेर वणी पोलीस ठाण्यात 30 मे रोजी तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तन्वीर शेखवर लक्ष केंद्रित केले. गुन्ह्याची चौकशी सुरू करताच तन्वीरने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून 7.5 तोळे वजनाचे सर्व सोन्याचे दागिने, ज्यांची अंदाजे किंमत 7 लाख रुपये आहे, हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी आरोपी तन्वीर शेखला अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रियेत आहे. पोलीसांनी या प्रकरणात केलेल्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पीडित शेतकरी रविंद्र राजुरकर यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.










