वणी टाईम्स न्युज : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व दुकाने, बँक, मॉल, कार्यालयांवरील नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक असताना शहरातील बहुतांश आस्थापना वरील साईनबोर्ड अद्यापही मराठी भाषेत नाही. त्यामुळे वणी नगर परिषद हद्दीतील सर्व आस्थापनावरील नाव फलकावर तात्काळ ठळक अक्षरात मराठी भाषेत नाव लिहावे. अशा प्रकारची नोटीस नगर परिषदेतर्फे जाहीर करण्यात आली आहे. मराठी भाषेत पाट्या न लावल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

नगर परिषद हद्दीतील सर्व आस्थापनावर मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अंकुश बोढे यांनी नगर परिषदकडे निवेदन दिले होते. तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक व तरतुदीनुसार सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाट्या मराठी भाषेत लावणे बंधनकारक आहे. या सर्व बाबीला अनुसरुन नगर परिषद तर्फे नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
दोन वर्षात निर्णयाची अंमलबजावणी नाही
मार्च 2022 मध्ये राज्याचे अर्थ संकल्पीय अधिवेशनात दुकाने, आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निर्णयाच्या विरोधात मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाचा निर्णय योग्य असून याचिका खारीज केली. तरी पण दोन वर्षानंतरही या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे.










