वणी टाईम्स न्युज:
झरीजामणी : सोसाट्याच्या वारा आणि पावसामुळे चुना फॅक्टरीचा शेड कोसळून एक महिला कामगार ठार तर 5 ते 6 इतर कामगार जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. झरीजामणी तालुक्यातील गणेशपुर (ख.) येथील डिलाईट केमिकल फॅक्टरीत बुधवारी रात्री 9 वाजता दरम्यान ही घटना घडली. गंगा सुग्रीवलाल (21) रा. पेरिटोला छत्तीसगढ असे मृत महिला कामगाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गणेशपूर शिवारात डिलाईट केमिकल प्रा. लिमी. या कंपनीत चुनखडी पासून व्हाईट वॉश लाइम पावडर तयार करून पॅकिंग करण्याचा काम सुरू होता.रात्री 9 वाजता दरम्यान तब्बल 50 फूट उंचीवर असलेला विशालकाय टिन शेड अचानक कोसळला. त्यावेळी रात्रपाळीत काम करणारे अंदाजे 15 कामगार काम करीत होते. घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने सर्व जखमी कामगारांना तातडीने वणी येथे आणले. मात्र गंभीर जखमी महिला कामगार गंगा हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृतक महिला कामगाराचे मृतदेहाचे पोस्टमार्टम करुन तिच्या गावी रवाना करण्यात आले. तर किरकोळ जखमी 5 ते 6 कामगारांना वणी येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन सुट्टी देण्यात आली. घटनेबाबत मुकुटबन पोलीस स्टेशनला कळविण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहे.










