वणी टाईम्स न्युज : मारेगाव तालुक्यातील एका गावात 35 वर्षीय इसमाने दारूच्या नशेत आपल्या पत्नीवर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी दि. 24 जून 2025 दुपारी घडली. याप्रकरणी पीडित महिलेने मारेगाव पोलीस स्टेशनला हजर होऊन जबानी तक्रार दिली.

तक्रारीनुसार, फिर्यादी महिला आपल्या दोन मुलींना घेऊन पतीसोबत गावात वास्तव्यास आहे. तिचा पती भिमराव आत्राम हा दारू पिण्याच्या सवयीचा असून किरकोळ कारणावरून पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असतो. दि. 24 जून रोजी दुपारी 12 वाजता भीमराव दारूच्या नशेत घरी आला व अंगणात खेळत असलेल्या त्याच्या 1 वर्षाच्या मुलीला धक्का दिला. यामुळे मुलगी खाली पडून रडू लागली. मुलीला धक्का का दिला ? असे पत्नीने विचारणा केली असता, पतीने रागाच्या भरात शिवीगाळ करत दगड उचलून फिर्यादी पत्नीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.
त्यानंतरही पतीने “तुला एके दिवशी जिवाने ठार मारतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादमध्ये नमूद आहे. सतत होणाऱ्या त्रासामुळे आणि पतीपासून जीवाला धोका निर्माण झाल्याने पीडित महिलेने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती भीमराव आत्राम विरुद्ध कलम 118 (1), 351(2), 351(3), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.










