वणी टाईम्स न्युज:
भारतीय डाक सेवेत कार्यरत एका तरुणीची घरासमोर ठेवलेली ऍक्टिव्हा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. चोरी गेलेल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये महत्त्वाचे कागदपत्र ही होते. शहरातील भीमनगर मोहल्ल्यात मंगळवार 24 जून रोजी रात्री 7 ते 9.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. दुचाकी चोरी गेल्याची तक्रार फिर्यादी पोस्टमेन स्वाती संतोष लाखाडे (21), रा.भीमनगर हिने पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
फिर्यादी तरुणी ही डोंगरगाव येथे पोस्टमेन म्हणून नोकरीवर आहेत. ती नेहमी तिच्या वडिलांच्या नावावर असलेली पांढऱ्या रंगाची ऍक्टिव्हा मोपेड क्रमांक MH29 BU 9976 घेऊन डोंगरगाव येथे येणे जाणे करते. दिनांक 24 जून रोजी फिर्यादी नेहमीप्रमाणे मुख्य डाकघर येथे हिशोब देऊन घरी आली व घरासमोर दुचाकी उभी केली. मोपेड घराचे आत लावण्यासाठी रात्री 9.30 वाजता दरम्यान फिर्यादी युवती गेटच्या बाहेर आली असता घरासमोर लावलेली ऍक्टिव्हा दिसून आली नाही.
आजुबाजूला शोध घेऊनही ऍक्टिव्हा मोपेड मिळून न आल्याने शेवटी तरुणीने वणी पोलिस स्टेशन मध्ये तिच्या वडिलांच्या नावावर आलेली पांढऱ्या रंगाची ऍक्टिव्हा 5G मोपेड किंमत अंदाजे 60 हजार रुपये अज्ञात इसमाने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करुन शोध सुरू केला आहे.










