वणी टाईम्स न्युज | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी शहर संपर्क प्रमुख राजू किसन तुराणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा थेट पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठविला असून, पक्षांतर्गत घडामोडी व संघटनात्मक कार्यपद्धतीबाबत असमाधान व्यक्त केले आहे.

राजू तुराणकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, ते १९९४ ते २००६ या कालावधीत विद्यार्थी तालुका प्रमुख, २००६ ते २०११ दरम्यान नगरसेवक, तसेच २०१४ ते २०२० या काळात शहर प्रमुख म्हणून कार्यरत होते. यानंतर २०२५ पासून ते वणी शहर संपर्क प्रमुख म्हणून कार्य करत होते. दीर्घकाळ पक्षासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करूनही, पक्षसंघटनेत योग्य सन्मान, समन्वय व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेण्याची भूमिका दिसून आल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, वणी नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान पक्षांतर्गत संवादाचा अभाव, स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित होणे, तसेच संघटनात्मक बैठकींमध्ये पदाधिकाऱ्यांचा उल्लेख न होणे, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. या सर्व बाबी मानसिक तणावास कारणीभूत ठरत असल्याने, कोणताही वाद न वाढवता आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी कळविले.
या राजीनाम्याची प्रत जिल्हाप्रमुख, स्थानिक आमदार व उपजिल्हा प्रमुख यांना पाठविण्यात आली आहे. राजू तुरणकर यांच्या राजीनाम्यामुळे वणी शहरातील शिवसेना संघटनात्मक पातळीवर नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, पुढील भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










