जितेंद्र कोठारी, वणी : समाजातील मतिमंद, मनोरुग्ण, निराधार व बेघर व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशनला वणी येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः यवतमाळ येथे जाऊन नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्याकडे ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी बोलताना संदीप शिंदे यांनी लायन्स इंग्लिश शाळेने दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील उपेक्षित, मानसिक आजारांनी ग्रस्त, बेघर तसेच कुटुंबापासून दुरावलेल्या व्यक्तींना आधार देण्याचे कार्य नंददीप फाउंडेशन सातत्याने करत असून, या आर्थिक सहकार्यामुळे आणखी गरजू व्यक्तींपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यात नंददीप फाउंडेशन हे सामाजिक बांधिलकी जपत निराधार व मनोरुग्ण व्यक्तींचे निवारा, अन्न, वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसन यासाठी कार्यरत असल्याची माहिती मिळते. रस्त्यावर भटकणाऱ्या किंवा कुटुंबीयांनी सोडून दिलेल्या व्यक्तींना शोधून त्यांच्यावर उपचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील असते. अनेक मनोरुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडण्याचे कामही संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे मत संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले. शिक्षणासोबतच सामाजिक संवेदनशीलतेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे सातत्याने केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या मदतीमुळे नंददीप फाउंडेशनच्या सेवाकार्यात अधिक बळ मिळणार असून, समाजातील गरजू, मतिमंद, मनोरुग्ण व बेघर व्यक्तींसाठी आशेचा किरण ठरणाऱ्या या संस्थेच्या कार्याला नवीन ऊर्जा मिळणार आहे.











