जितेंद्र कोठारी, वणी: वणी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासह २९ नगरसेवकांच्या निवडीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवार, २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीची प्रत्यक्ष मतमोजणी रविवार, २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.
शहरातील एकूण १४ प्रभागाचे निकाल जाहीर करण्यासाठी सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी होईल. त्यानंतर अनुक्रमे उर्वरित प्रभागांची मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 14(क) ची मतमोजणी 6 व्या फेरीत होणार आहे. मतमोजणीसाठी 13 टेबल राहणार असून प्रत्येक फेरीनंतर संबंधित प्रभागांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून मतमोजणी केंद्रावरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार आहे. मतमोजणीदरम्यान उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी मतमोजणी कक्षात उपस्थित राहू शकतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नगर परिषदेवर सत्ता कुणाची येणार, अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे शहरातील नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणूक निकालांमुळे वणी शहराच्या आगामी विकासाच्या दिशेवर महत्त्वाचा परिणाम होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










