वणी टाईम्स न्युज: वणी शहरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वणी नगर परिषदेकडून सन २०२५-२६ ते २०२८-२९ या आर्थिक वर्षाकरिता प्रस्तावित करण्यात आलेल्या चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकनास मुख्यमंत्री यांनी स्थगिती दिली आहे. वाढीव घर टॅक्स रद्द करण्यात यावा याकरिता माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारसह भाजप पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते.
वणी नगर परिषदेकडून काही दिवसांपूर्वी नागरिकांना नवीन कर मूल्यांकनाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. या प्रस्तावात चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत काही ठिकाणी करात ३ ते ४ पट तर काही ठिकाणी तब्बल ६ पट वाढ करण्यात आली होती. ही वाढ महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील तरतुदींना विरोधात असून नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर अन्यायकारक भार टाकणारी असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजीवऱेड्डी बोदकुरवार आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वणी नगरपरिषदेच्या प्रस्तावित कर आकारणीस स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यावर तत्परतेने कार्यवाही करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित प्रस्तावास स्थगिती देण्याचे आदेश पारित केले असून मुख्यमंत्री सचिवालयाकडून नगर परिषद वणीला याबाबत अधिकृत पत्र कळविण्यात आले आहे.

या निर्णयामुळे वणीकर नागरिकांना दिलासा मिळाला असून शहरात आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाबाबत माजी आमदार संजीवऱेड्डी बोदकुरवार यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वणीकर जनतेतर्फे आभार मानले. तसेच ते म्हणाले की, “मी आज आमदार नसूनही वणीकर जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.










