जितेंद्र कोठारी : वणी शहरात गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने वाढलेल्या व्यापारिक विस्तारामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरात कुठेही अधिकृत वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने दररोज ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात ग्राहकांना बाजारात पायी चालणेही अवघड बनले आहे.

शहरातील मोठ्या दुकानांना, मॉलना, बँका, पतसंस्था, हॉटेलना स्वतःचे पार्किंग स्थळ नाही. त्यामुळे ग्राहक व नागरिकांना दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. परिणामी, अरुंद रस्त्यांवरून जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. विशेषतः स्टेट बँकेसमोरील मुख्य मार्गावर दररोज अनेक वेळा ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. गाड्यांच्या रांगा लागत असून, शाळा-ऑफिसच्या वेळेत तर हा परिसर पूर्णतः ठप्प होतो. नागरिकांचा प्रश्न आहे की, “स्वतःचे पार्किंग नसताना नगर परिषद या व्यावसायिक आस्थापनांना परवानगी देते कशी?”
👓 गांधी चौक मार्ग सर्वाधिक प्रभावित
महाराष्ट्र बँक चौक ते गांधी चौक या दरम्यान मोठ्या प्रमाणात कपड्यांच्या दुकानांनी ‘सेल’ लावून फूटपाथ व रस्त्याचा अर्धा भाग व्यापला आहे. त्यातच फळ-भाजी विक्रेते, पाणीपुरी, चाट सेंटर व हातगाड्या यांच्या गर्दीमुळे मार्ग अधिकच अरुंद झाला आहे. टिळक चौक, जटाशंकर चौक, खाती चौक, टागोर चौक या प्रमुख भागांतही हीच परिस्थिती दिसून येते. वाहतूक पोलीस व नगर परिषद यांच्यात समन्वय नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.

🚗“वाहनतळाची ठोस योजना हवी”
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, नगर परिषद केवळ कर वसुलीत व्यस्त असून नागरिकांच्या सोयीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. व्यापारी क्षेत्रात वाढ होत असताना पार्किंगविषयी कोणतीही योजना नाही. शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक संघटनांनी नगर परिषदेने तातडीने सार्वजनिक वाहनतळाची योजना तयार करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.










