वणी टाईम्स न्युज : राज्यात नगर पालिका व नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक व 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाने विजयी शंखनाद करत एका महत्त्वाच्या नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. लढण्यापूर्वीच विरोधकांनी हत्यार टाकल्याने संपूर्ण राज्यात भाजप कार्यकर्त्यांचा मनोबल वाढला आहे.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईच वरवाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकंवर रावल यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर नाम निर्देशन परत घेण्याचा अखेरच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (श.प,) एमआयएम, आम आदमी पार्टी तसेच अपक्ष अशा सर्व उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे दोंडाईच नगर परिषदेच्या 13 प्रभागाचे भाजपचे सर्व 26 उमेदवारांना बिनविरोध विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने घोषित केले.

स्वातंत्र्यनंतर 73 वर्षाच्या काळात पहिल्यांदा दोंडाईच नगर परिषदेची निवडणूक अविरोध झाली आहे. यासाठी भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांनी तगडी रणनीती आखली होती. भाजप उमेदवारांची अविरोध निवड झाल्यानंतर संपूर्ण दोंडाईच शहरात गुलाल, फटाके व मिठाई वाटून विजय साजरा करण्यात आला. दोंडाईच नगर परिषदेच्या निकालाने राज्यातील नगर परिषद निवडणुक मैदानात भाजप उमेदवारांचे उत्साह वाढले आहे.










