वणी टाईम्स न्युज : कोणाचा मृत्यू कधी आणि कसा येईल याचा अंदाज लावता येत नाही. दुकानावर ग्राहकांना सामान देत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन एका महिला दुकानदाराची मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री 10 वाजता दरम्यान घडली. यात नांदेपेरा मार्गावरील सहारा प्रोव्हिजनच्या मालकीण ज्योती विजय कवरासे (45 )हिचे निधन झाले. ही घटना दुकान चालू असतानाच घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नांदेपेरा मार्गावर विजय कवरासे यांचे सहारा प्रोव्हिजन नावाने किराणा दुकान आहे. विजय कवरासे आणि त्यांची पत्नी ज्योती ही दोघं मिळून दुकान चालवतात. बुधवार 23 जुलै रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंत ज्योती ह्या नेहमीप्रमाणे ग्राहकांशी हसतमुखपणे संवाद साधत किराणा सामान देत होत्या. यानंतर काही वेळातच त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ईसीजी तपासणीदरम्यान त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले आणि डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही घटना इतकी अचानक व वेदनादायक होती की ज्यांनी काही मिनिटांपूर्वीच त्यांच्याकडून किराणा घेतला, त्यांनाही धक्काच बसला. मृतक ज्योती यांच्या पश्चात पती विजय कवरासे, सासरे आणि दोन मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.










