वणी टाईम्स न्यूज : वणी शहरात सट्टाकिंग म्हणून ओळख असलेले जमीर खान उर्फ जम्मू यास एमपीडीए (महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, 1981) कायद्यान्वये सोमवार 9 जून रोजी अटक करण्यात आली आहे. जमीर खान यास 6 महिने कारागृहात स्थानाबद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिले आहे. मटका, सट्टा, जुगार, हल्ला, दंगल, गुंडगिरी आणि मालमत्तेचे नुकसान असे अनेक गुन्हे जमीर खान विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
जम्मू खान विरुध्द अनेक गुन्हे दाखल असल्याने उप विभागीय पोलीस अधिकारी वणी व ठाणेदार पोलिस स्टेशन वणी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 अन्वये स्थानबध्द करण्या बाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक,यवतमाळ यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, यवतमाळ यांना सादर केला होता. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ यांनी दिनांक 9 जून 2025 रोजी जमीरखान ऊर्फ जम्मू यास स्थानबध्द आदेश जारी केले. आदेशानुसार जमीर खान याला अटक करुन जिल्हा मध्यवर्ती कारागृह, यवतमाळ येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
MPDA अंतर्गत शहरात पहिली कारवाई
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले तसेच धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था भंग करणार्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येवू शकते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला जास्तीत जास्त एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करता येते. कारवाईनंतर त्याला पोलीस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे अपील करता येते. वणी शहर पोलिस ठाणे अंतर्गत एमपीडीए कायद्या अंतर्गत ही पहिली कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.










