वणी टाईम्स न्युज | राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींवर तातडीने निर्णय व्हावा, या मागणीसाठी महाराष्ट्रभरातील कृषी सेवा केंद्र चालकांनी दि. २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर वणी तालुका कृषी साहित्य संघाने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. सोमवार 27 एप्रिल रोजी येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांनी हा निर्णय घेतला.
गेल्या ४ ते ५ वर्षांपासून बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशक विक्री व्यवसायातील विविध अडचणींबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागाकडून ठोस निर्णय न झाल्याने अखेर विक्रेत्यांनी कठोर भूमिका घेत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रमुख मागण्या काय?
विक्रेत्यांच्या संघटनेने शासनासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये खत पुरवठ्यातील लिंकिंग पद्धत बंद करणे, अप्रमाणित HTBT कापूस बियाण्यांवर बंदी, नमुने फेल झाल्यास विक्रेत्यांना आरोपी न धरणे, ‘साथी’ पोर्टलचा सक्तीचा वापर थांबवणे, विक्री मार्जिन वाढवणे, तसेच गुणवत्ता तपासणी अहवाल वेळेत देणे या मुद्द्यांचा समावेश आहे.
याशिवाय, बेकायदेशीर कीटकनाशकांवर कठोर कारवाई, नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्यांतील तरतुदी स्पष्ट करणे आणि खरीप हंगाम २०२६ साठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची भीती
कृषी सेवा केंद्रे बंद राहिल्यास शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशके मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते.
विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठीच असून, अप्रमाणित बियाणे व खत पुरवठ्यातील त्रुटींमुळे होणारे नुकसान टाळणे हा मुख्य उद्देश आहे.”
शासनाकडे पुन्हा मागणी
राज्य शासनाने तातडीने निर्णय घेऊन विक्रेत्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कृषी विभाग व विक्रेते यांच्यातील विश्वासाचे नाते कायम ठेवत आगामी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्याची भूमिका संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.










