वणी टाईम्स न्युज | तालुक्यातील रासा येथे एका आदिवासी महिलेवर घरात घुसून मारहाण केल्याची व जातिवाचक शिवीगाळ करत धमक्या दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रासा व गणेशपूर येथील 7 जणांवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार संगीता गजानन कोरचे (वय 45) यांनी दिलेल्या जबानीनुसार, दिनांक 16 मार्चच्या मध्यरात्री आरोपी जिवन भोगडे (45), गजानन भोगडे (60), पवन भोगडे (42), वैष्णवी भोगडे (40), निलीमा भोगडे (35) व मुलीची आजी (नाव अज्ञात), सर्व रा. रासा, ता. वणी यांनी त्यांच्या घरासमोर येऊन दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच जिवन व पवन यांनी त्यांना जबरदस्तीने घराबाहेर ओढून खाली पाडले व सर्वांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी आरोपींनी “तुमच्या मुलाने आमच्या मुलीला पळवून नेले” या कारणावरून वाद घालत जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रविण रोगे (45, रा. छोरिया लेआऊट, गणेशपुर, वणी) यांनीही येऊन तक्रारदाराला कानशिलात मारल्याचे नमूद आहे. “आवाज केल्यास पेटवून टाकू” अशी धमकीही देण्यात आली. घटनेचा आवाज ऐकून शेजारी धावून आल्यावर सर्व आरोपी तेथून पसार झाले.
पुढील दिवशी सकाळी तक्रारदारांच्या आई-वडिलांच्या घरी जाऊनही आरोपींनी माधव नैताम, शांताबाई नैताम व बंडू नैताम यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वणी पोलीसांनी अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 मधील कलमे 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलीसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.










