वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
फिर्यादी आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिची मुलगी ही इयत्ता बारावीची विद्यार्थीनी असून ती नेहमीप्रमाणे शिक्षणासाठी बसने शहरात ये-जा करत होती. दि. 15 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास ती वडिलांसोबत शहरात आली होती. बसस्थानक परिसरात पोहोचल्यानंतर तिने वडिलांना सांगितले की बाबा मी “ट्युशनला जाऊन येते” तुम्ही गावाकडे जा. असे सांगत वडिलांना गावाकडे परत पाठवले.
मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी सुरुवातीला नातेवाईक व मैत्रिणीकडे शोध घेतला. शहरासह परिसरात शोधमोहीम राबवूनही मुलगी सापडली नसल्याने अखेर पोलिसांकडे धाव घेण्यात आली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, अल्पवयीन असल्याची जाणीव असतानाही अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 137 (2) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून मुलीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत.










