वणी टाईम्स न्युज | शहरातील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या मालकीची शेतजमिनीवरील लागवड केलेली हजारों बांबू अचानक गायब झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. सदर प्रकरणी संस्थेच्या प्राचार्य यांनी तब्बल आठ दिवसांपूर्वी वणी पोलीस ठाण्यात बांबू चोरी गेल्याची लेखी तक्रार दिल्याचे समजते.
सदर तक्रारीवर चौकशी करत पोलिसांनी बांबू चोरणाऱ्या एका इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली. सदर इसमाने पोलिसांना दिलेल्या जबानीत त्यांनी बांबू झाडे चोरले नसून ‘संस्थेतीलच एका कर्मचाऱ्यांनी 27 हजार रुपयांत बांबू विकले’ असा दावा केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
उल्लेखनीय आहे की सदर शिक्षण संस्थेच्या मालकीची शहरालगत तब्बल 32 एकर शेत जमिनीवर 6 वर्षापूर्वी बांबू लागवड करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यातील हजारो बांबू कुणीतरी कापून चोरी केल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे संस्थेच्या संचालकांच्या आदेशाने प्राचार्य यांनी बांबू चोरी झाल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दिली होती.
मात्र पोलिस तपासादरम्यान समोर आलेल्या ‘आतील व्यवहारा’च्या शक्यतेमुळे संस्थेच्या संचालकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सदर प्रकरणात संस्थेची संभाव्य बदनामी लक्षात घेता प्रकरण परस्पर मिटविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जरी पोलिस ठाण्यात अद्याप कोणावर गुन्हा दाखल करण्यात आले नसले तरी संस्थेच्या मालकीची मालमत्ता परस्पर विकणाऱ्या कर्मचाऱ्यावर संस्था काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बांबू चोरी प्रकरणाबाबत संस्थेच्या एका जबाबदार कर्मचाऱ्यांशी माहिती घेण्याचा प्रयत्न केले असता त्यांनी बांबू चोरी झाल्याची घटनेला दुजोरा दिला. मात्र पोलीस किंवा संस्थेने काय कारवाई केली ? याबाबत अधिक बोलण्यास टाळले.










