वणी टाईम्स न्युज | झरीजामणी तालुक्यातील मौजा हिवराबारसा येथे उभारण्यात आलेल्या सोलर प्लांटमधून लाखों रुपयांचा कॉपर डीसी केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रोजेक्ट इंजिनिअर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोलर प्लांटच्या सुरक्षेसाठी 24 x7 सिक्युरिटी गार्ड ड्युटीवर असताना चोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तक्रारदार प्रतिक दिलीप भरणे (31), रा. चिखली ईजारा, ता. आर्णी हे सन फिन्टी रेनेबल प्रा. लि., नोयडा या कंपनीत प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या देखरेखीखाली हिवराबारसा येथे सोलर प्रकल्प उभारण्यात आला असून तेथे सुरक्षेसाठी चार सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, दि. 10 ते 12 मार्च 2026 दरम्यान प्रकल्पावर डीसी केबल बसविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र दि. 13 मार्च रोजी सकाळी पाहणीदरम्यान इनव्हर्टरला जोडलेली सुमारे 7200 मीटर लांबीची कॉपर डीसी केबल अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
घटनास्थळी तपासणी केली असता कंपाऊंडच्या तारेला एका ठिकाणी कापून वाकविण्यात आल्याचे आढळले. यावरून चोरट्यांनी नियोजनपूर्वक चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या चोरीतील मुद्देमालाची अंदाजे किंमत 2 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.










