वणी टाईम्स न्यूज | शहरातील शिक्षणाचे प्रसार करणाऱ्या एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या मालकीच्या जमिनीवरील हजारो बांबूंच्या कथित चोरी व परस्पर विक्री प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संस्थेतीलच एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची बातमी वणी टाईम्स या आघाडीच्या न्युज पोर्टलवर शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर शहरात तसेच संस्थेच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या घटनेमुळे “झारीतील शुक्राचार्य कोण?” असा सवाल उपस्थित होत असून, ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी होती त्यांनीच गैरप्रकार केला का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांवरही संशयाची छाया पडत असल्याने त्यांनी संबंधित दोषी कर्मचाऱ्याचे नाव जाहीर करण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केल्याची माहिती आहे. मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यावर ना संस्थेकडून कोणती ठोस कारवाई करण्यात आली आहे, ना पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
राजकीय सेटिंग’चे प्रयत्न !
या प्रकरणात बांबू खरेदीदाराला वाचवण्यासाठी एका माजी सरपंचाकडून ‘सेटिंग’ करण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, संस्थेकडून वणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, अद्याप FIR दाखल न झाल्याने संशय अधिक गडद होत आहे.
कारवाई होणार की तडजोड ?
संस्थेच्या मालमत्तेची परस्पर विक्री केल्याचा आरोप असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार की नुकसानभरपाईच्या माध्यमातून प्रकरण मिटवले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय 31 मार्चनंतर स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टिप: सदर बातमीत AI द्वारे निर्मित फिचर इमेजचे वापर करण्यात आले आहे.










