वणी टाईम्स न्युज: नळ फिटिंग साहित्य (प्लम्बिंग) व्यावसायिकाला कमी दरात समान खरेदी करुन देण्याचा भूलथापा देऊन 4 लाख रुपयांची बॅग घेऊन भामटे पसार झाले. दिनांक 8 डिसेंबर रोजी वणी येथील बस स्थानक समोर दुपारी 3.30 वाजता घडलेल्या या घटनेबाबत फिर्यादी वरोरा येथील व्यावसायिक गणेश श्रावण मून, रा. बोर्डा, तालुका वरोरा यांनी वणी पोलीस ठाण्यात 2 अनोळखी इसमाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
तक्रारीनुसार फिर्यादी याची नळ फिटिंग साहित्याची दुकान आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्याच्या दुकानावर दोन ग्राहक आले व त्यांनी नळ फिटिंगचे साहित्य खरेदी केले. त्यानंतर परत दोन तीन वेळा ते दुकानात आले व त्यांनी व्यावसायिकाला दुकानासाठी कमी दरात समान मिळवून देण्याचा आमिष दाखवला. आमिषाला बळी पडून फिर्यादी हा सोमवार 8 डिसेंबर रोजी पत्नीसह वणी येथे आला.
बस स्थानक परिसरात फिर्यादी यांची त्या दोघं अनोळखी इसमासोबत भेट झाली. चहा पिण्याच्या बहाण्याने दोघांनी दांपत्याला बस स्थानक समोर एका चाय कॅन्टीन वर नेले. त्यावेळी फिर्यादी गणेश मून यांच्या पत्नीच्या हातात 4 लाख रुपयांनी भरलेले बॅग होते. चहा पित असताना भामट्यांनी दोघांना भुरळ घालून फिर्यादीच्या पत्नीच्या हातात असलेली बॅग हिसकावून पळ काढला. भामटे पैसे घेऊन पसार झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. तक्रार व गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी अनोळखी आरोपी विरुद्ध कलम 304(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
तक्रारीवर संशयाची सुई..!
फिर्यादी गणेश मून यांनी नोंदविलेल्या तक्रारीत आरोपी अनोळखी म्हणून नमूद केले आहे. मात्र आरोपी यापूर्वी दोन तीन वेळा त्यांच्या दुकानावर गेले होते. तसेच कमिशन घेऊन साहित्य खरेदी करुन देणाऱ्या व्यक्तीचा नाव पत्ता माहित नसणे हे न पटण्यासारखे आहे. विशेष म्हणजे वरोरा येथील दुकानदाराने खरेदीसाठी नागपूर न जाता वणीला येणे ही संशयाची गोष्ट आहे. एकूणच फिर्यादीच्या तक्रारीमध्येच मोठा घोळ असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे पोलिस तपासानंतरच खरंखोटं समोर येणार आहे.










