वणी टाईम्स न्युज : कायर येथील बस स्टँडजवळ एका व्यक्तीकडून अवैधरित्या डिझेलचा साठा करून त्याची विक्री केल्या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी कारवाई करत 15 लिटर डिझेल जप्त केले. डिझेल साठवण व विक्रीसंदर्भात कोणताही वैध परवाना नसतांना मानवी जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत प्रकाशचंद भरूट (40), रा. बाजोरिया नगर, यवतमाळ, ह.मु. कायर, ता. वणी असे आरोपीचे नाव आहे.
गुरुवार 31 जुलै रोजी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी कायर येथे असताना शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत झोड व कल्पेश चांदेकर यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, बस स्टँडजवळील कान्हा चहा कॉन्टिनेट जवळ एक इसम वाहनांमधील डिझेल अवैधपणे विक्री करत आहे. यावर तत्काळ कारवाई करत पोलीसांनी पंचासमक्ष सदर ठिकाणी धाड टाकली असता आरोपी जवळून एक प्लास्टिक कॅनमध्ये 15 लिटर डीझल (₹1395) जप्त केला.
पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत झोड यांच्या फिर्यादवरून शिरपूर पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत भरुट, रा. यवतमाळ विरुद्ध कलम 285 व 286 BNS नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत










