वणी टाईम्स न्युज | वडगाव (धंदीर) येथील बहुचर्चित भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या अर्जनवीस सतीश केराम याला पोलिसांनी शुक्रवार २२ मे रोजी पांढरकवडा येथून अटक केली. माहितीनुसार, केराम याने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तो न्यायालयाबाहेर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी शैलेश वाकडे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मंडळ अधिकारी व तलाठींना आधीच अटकपूर्व जामीन
या प्रकरणात आरोपी असलेले मंडळ अधिकारी राजू डोंगरे आणि तलाठी रवींद्र उपरे यांना २२ मे रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय, केळापूर यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. यावरून आता पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 6 दिवस मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना अटक करण्यात आली नाही. उलट त्यांना अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक मुभा दिल्याचा आरोप शहरात होत आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांचे पत्र चर्चेत
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तलाठी उपरे यांच्यावर गुन्हा दाखल करू नये, यासाठी उपविभागीय अधिकारी, वणी यांनी वणी पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांना लेखी पत्र दिले होते. मात्र शहरातील पत्रकारांनी सातत्याने पाठपुरावा आणि दबाव निर्माण केल्यानंतरच पोलिसांनी मंडळ अधिकारी राजू डोंगरे आणि तलाठी रवींद्र उपरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे.
केरामच्या अटकेनंतर आणखी खुलासे होणार ?
भूखंड व्यवहारातील कथित बनावट कागदपत्रे, महसुली नोंदींतील फेरफार आणि प्रॉपर्टी नेटवर्क यामध्ये सतीश केराम हा मुख्य दुवा मानला जात असल्याने, त्याच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेषतः या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहेत, महसूल विभागातील इतर अधिकारी किंवा दलालांचे संबंध आहेत का, याबाबत आता पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










