वणी टाईम्स न्युज : रात्री गस्त दरम्यान अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना एक टाटा हायवा ट्रक शुक्रवारी रात्री 10.40 वाजता पोलिसांनी रवी नगर भागात अडविला होता. रेती वाहतुकी संदर्भात कोणतेही अधिकृत कागदपत्र चालकाकडे आढळले नाही. त्यामुळे सदर रेती चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची खात्रीवरून पोलिसांनी रेती भरलेला ट्रक पोलीस स्टेशन येथे लावले. सदर प्रकरणी 7 ब्रास रेती (42 हजार) व टाटा हायवा ट्रक क्रमांक MH34 BG 1596 (25 लाख) असे एकूण 25 लाख 42 हजाराचा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी ट्रक चालक मुशीर खान रशीद खान पठाण (29), रा. बल्लारशाह, जि. चंद्रपूर यांनी ही रेती पिपरी घाट, भद्रावती (जि. चंद्रपूर) येथून आणल्याचे सांगितले. तसेच रेती वाहतुकीसंदर्भात कोणतेही अधिकृत कागदपत्र चालकाकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चालक मुशीर खान रशीद खान पठाण याच्याविरुद्ध कलम 379 भादंवि (सुधारित: 303(2)) तसेच कलम 48(8) जमीन महसूल कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वाहन चालकच आरोपी, वाहन मालक मात्र मोकाट.!
असे निदर्शनास आले आहे की, रेतीची तस्करी पकडल्यानंतर रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चालकावर गुन्हा दाखल करण्यात येते. मात्र रेती तस्करी करणारा खरा गुन्हेगार व वाहन मालकाला नेहेमी गुन्ह्यातून वगळण्यात येते. वास्तविक पाहता वाहन चालकाचा रेती चोरी व तस्करीशी काहीही संबंध नसतो. तो मासिक पगार घेऊन वाहन चालवणारा एक कामगार म्हणून असतो. सदर प्रकरणामध्येही हायवा चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ट्रक मालक चिन्ना व रेती तस्कर पटेल यांचे नाव एफआयआर मधून वगळण्यात आले आहे. ट्रकच्या केबिनमध्ये ठेवलेली RC, परमिट, फिटनेस, पीयूसी चेक केली तर ट्रक मालकाचे नाव समोर येते. मात्र परिवहन विभागाकडून अधिकृत माहिती घेण्याच्या नावाखाली ट्रक मालकाला मोकळीक देण्यात येते.
महसूल विभागाचे पथक गेले कुठे ?
रेती तस्करी रोखण्यासाठी काही महिन्यापूर्वी महसूल विभागात वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. काही दिवस पथकाने कारवाईचा तावही आणलं. मात्र त्यानंतर “तेरी भी चूप मेरी भी चूप” प्रमाणे सर्व काही शांत झाले. चंद्रपूर व भद्रावती येथून रेतीची मोठ्याप्रमाणात दिवसरात्र आवक असताना महसूल अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याचे बोलल्या जाते










