वणी टाईम्स न्युज | वणी उपविभागात एका आठवड्यात वेगवेगळ्या गावातून चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तींनी फूस लावून मुलींना पळवून नेल्याचा संशयावरून संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात कुटुंबासह वास्तव्यास 16 वर्षीय विद्यार्थिनी 24 मार्च रोजी पाटण येथे शाळेला जाण्यासाठी निघाली. मात्र नेहमीच्या वेळेवर मुलगी परत घरी न आल्याने कुटुंबीयांनी गावात, शाळा परिसरात व कुटुंबीयांकडे शोधाशोध केली. मात्र ती सापडली नाही. त्यानंतर बेपत्ता मुलीच्या वडीलांनी अज्ञात व्यक्तीने त्यांची अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली.
मुकूटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारची घटना घडली असून, 28 मार्च रोजी मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडलेली मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली. विशेष म्हणजे, याआधीही संबंधित मुलगी घरातून निघून गेल्याची घटना घडली होती, मात्र ती परत आली होती. यावेळी मात्र ती अद्याप बेपत्ता आहे. सदर घटनेबाबत बेपत्ता मुलीच्या आईने मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोस्टमास्टर तरुणीला लग्नासाठी दबाव; फोटो व्हायरल करण्याची धमकी
मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई आणि आजीसह राहत असलेले 15 वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. दहावीची परीक्षा दिल्यानंतर मुलगी घरीच राहत असे. दिनांक 27 मार्च रोजी तिची आई आणि आजी कामाला गेल्या असता, घरी असलेली मुलगी अचानक घरातून गायब झाली. सायंकाळी कामावरून परत आल्यानंतर मुलगी घरी दिसून पडली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक व मैत्रिणींकडे चौकशी केली, मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. शेवटी मुलीच्या आईने मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
दरम्यान, वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात कुटुंबीय गाढ झोपेत असताना त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुटुंबीयांनी घर व परिसरात शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. याबाबत मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तिची अल्पवयीन मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदवली.
📍 पोलिसांची भूमिका –
चारही प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) नुसार अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.
⚠️ सामाजिक चिंता वाढली –
अल्पावधीत चार मुली बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनीही आपल्या पाल्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचा आवाहन पोलिसांनी केले आहे.










