वणी टाईम्स न्युज | मारेगाव येथील उत्पन्न बाजार समिती परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर पतीकडून सातत्याने शारीरिक व मानसिक अत्याचार होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
तक्रारीनुसार, सुमारे 2010 पासून विवाहानंतर सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेले. मात्र त्यानंतर पतीने किरकोळ कारणांवरून वाद घालत शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. कालांतराने हा त्रास वाढत गेला. घरखर्चासाठी पैसे मागितल्यास अपमानास्पद वागणूक दिली जात होती. तसेच मुलांबाबतही अवमानकारक वक्तव्ये करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, पतीचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर कौटुंबिक वाद अधिक तीव्र झाला. संबंधित व्यक्तीने पत्नीला वारंवार मारहाण करून मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. काही दिवसांपूर्वी तो दुसऱ्या महिलेसोबत घर सोडून गेल्याचेही सांगण्यात आले.
तक्रारदार महिला सध्या आपल्या मुलांसह माहेरी राहत असून, 5 एप्रिल रोजी सकाळी फोनवरून पतीने पुन्हा धमकी दिल्याचा आरोप आहे. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने मारेगावात आल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सदर प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी पती विरुद्ध कलम 351(2), 351(3), 352 व 85 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










