वणी टाईम्स न्युज | शहरातील निलापूर रोड परिसरात असलेल्या इंदिरा एक्झिम प्रा. लिमी. या जिनिंग फॅक्ट्रीमध्ये रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10.20 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत जीनिंग युनिटमधील कापूस व इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जीनिंग युनिटमधून अचानक धूर निघताना दिसल्याने कर्मचाऱ्यांनी तत्काळ फॅक्टरी प्रबंधकांना माहिती देऊन कारखान्यातील अग्निशामक यंत्रणा सुरू केली. तसेच कापूस जिनिंगमध्ये आगीची माहिती अग्निशमन विभाग व पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच नगर परिषद अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहचले. फॅक्टरीतील अग्निशामक बांबू व अग्निशामक वाहनाच्या सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगीमुळे इंदिरा एक्झिम जीनिंगमधील कापूस साठा मोठ्या प्रमाणात जळाल्याने तब्बल 40 ते 50 लाखाचा आर्थिक नुकसान झाल्याची माहिती जिनिंग प्रबंधकांनी दिली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.










