वणी टाईम्स न्युज : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालकीची जमिनीवरून बांबू व झाडे चोरी प्रकरणी अखेर 7 एप्रिल रोजी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी डॉ. प्रसाद अरुण खानझोडे (47), प्राचार्य, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालकीची मौजा चिखलगाव येथे तब्बल 32 एकर जमीन आहे. सदर जमिनीवर 6 वर्षापूर्वी बांबू व सुबाभळीचे झाडे लावण्यात आले होते. तसेच उर्वरित जागा संस्थेतील एका कर्मचाऱ्याला शेतीसाठी वार्षिक मक्त्यावर देण्यात येत होती. दिनांक 17 मार्च रोजी फिर्यादी हे जागेचे मोजमाप करण्यासाठी घटनास्थळी गेले असता मोठ्या प्रमाणात बांबू व सुबाभूळचे झाडे कोणीतरी कापून नेल्याचे निदर्शनास आले.
संस्थेच्या जागेवरून बांबू चोरीच्या घटनेबाबत संचालक मंडळाच्या आदेशाने फिर्यादी यांनी 17 मार्च रोजी वणी पोलीस ठाण्यात 14 बांबूच्या झुडपांमधील अंदाजे 210 बांबू (प्रत्येकी किंमत 350 रुपये) तसेच 10 सुबाभूळ झाडे (प्रत्येकी किंमत 2500 रुपये) अशी एकूण 98,500 रुपयांची झाडे अज्ञात इसमाने कापून चोरून नेल्याची लेखी तक्रार दिली. मात्र वणी पोलिसांनी उलट फिर्यादी यांना तुमच्या जागेबाबत व बांबू लागवडीबाबत पुरावे व इतर कागदपत्र आणून द्या अस सांगून 20 दिवसांपर्यंत FIR दाखलच नाही केली.
जागेच्या मालकी हक्काचे सर्व पुरावे व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करुनही पोलीस गुन्हा दाखल करण्यास सतत टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर संस्था संचालकांनी आपले राजकीय सूत्र हलवले. अखेर पोलिसांनी 7 एप्रिल 2026 रोजी 98 हजार 500 रुपये किमतीचे बांबू व बाभळी झाडे चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल केला.
उल्लेखनीय आहे की वणी टाईम्स न्युज पोर्टलने सर्वात आधी 27 मार्च रोजी “शिक्षण संस्थेच्या जमिनीवरील हजारो बांबू चोरी” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. तसेच बांबू चोरी झाले नसून सदर शिक्षण संस्थेच्या एका कर्मचाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याची खमंग चर्चा असल्याचा उल्लेख केला होता. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात बांबू चोरी अथवा विक्री करणाऱ्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल का हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.










