वणी टाईम्स न्युज: लग्नाच्या रिसेप्शन मध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित मारहाणीत परावर्तित झाले. चिखलगाव येथील मेघदूत कॉलिनमधील दोन कुटुंबात झालेल्या मारहाणीच्या या घटनेत कुऱ्हाड व लोखंडी रॉडच्या हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी झाले.

मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता घडलेल्या मारहाणीच्या घटनेबाबत दोन्ही गटाने बुधवारी सकाळी वणी पोलिस ठाण्यात एकमेकांविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही गटातील 13 जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीच्या घटनेत घातक शस्त्रांचे वापर झाल्यामुळे यवतमाळ येथून फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळ चौकशी करुन नमुने गोळा केले.
फिर्यादी रिकेश जयनारायण यादव (30) रा. मेघदूत कॉलनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तिरुपती बकय्या लक्कमवार, सतीश बकय्या लक्कमवार, रा. मेघदूत कॉलनी चिखलगाव, मोनू उर्फ मोहम्मद इकलास, आवेश कच्ची, रा. राजूर कॉलरी, बबलू साधू कन्कम रा. छोरीया लेआऊट वणी, व साई शेडला, रा. वरोरा विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 115(2), 352, 189(2), 190, 191(2) आणि 191(3) नुसार गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या गटातील फिर्यादी सतीश बकय्या लक्कमवार, रा. मेघदूत कॉलनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अवदेश जयनारायण यादव, रिकेश जयनारायण यादव, बादल रामभवन यादव व अनोळखी 4 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 115(2), 189(2), 190, 191(2), 191(3) अन्वये गुन्हा दाखल करुन चौकशी सुरू केली आहे.










