वणी टाईम्स न्युज: वणी यवतमाळ मार्गावर बाकडे पेट्रोल पंपाला लागून ऑटोमोबाईल दुकानासमोर एका तरुणाची निर्घृण हत्या झाली. बुधवारी रात्री 10 वाजता सुमारास ही घटना उघडकीस आली. मल्लेश नेरकुंटलावार {23} रा. दामले फैल वणी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी मंगेश उर्फ भुऱ्या डाखरे (28), रा. पळसोनी ता. वणी यास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
भर रस्त्यावर युवकाचा खून झाल्याची वार्ता पसरताच बाकडे पेट्रोल पंप परिसरात बघ्यांची गर्दी झाली. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, ठाणेदार गोपाल उंबरकर यांचेसह एलसीबी व वाहतूक शाखेचे अधिकारी व मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
मारेकरी मंगेश उर्फ भुऱ्या आणि मृतक युवक हे दोघे मित्र असून दारुच्या नशेत दोघांमध्ये वाद होऊन आरोपी भुऱ्याने मल्लेशच्या डोक्यावर लोखंडी गजालीने प्रहार करून खून केल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. खून करणाऱ्या आरोपी भुऱ्यावर यापूर्वीही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. मृतक मल्लेश याच्या मृतदेहाचा शासकीय पंचासमोर इन कॅमेरा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.










