वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील वनोजा (देवी) ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच डिमन गोवर्धन टोंगे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३६ अंतर्गत अपात्र घोषित करण्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी पारित केला आहे. ग्रामपंचायत उपसरपंच प्रशांतकुमार प्रकाशचंद भंडारी यांनी दाखल केलेल्या विवाद अर्जावर ही कारवाई करण्यात आली.

अर्जदाराने आपल्या अर्जात नमूद केले होते की, सरपंचांनी एका वर्षात ग्रामसभा तसेच दरमहा घेणे बंधनकारक असलेली मासिक सभा घेतलेली नाही. विशेषतः फेब्रुवारी २०२३ महिन्यातील मासिक सभा घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणात ग्रामपंचायत सचिवांनी सादर केलेल्या अहवालातही फेब्रुवारी २०२३ ची सभा न झाल्याचे नमूद करण्यात आले. तसेच सरपंचांनी संबंधित सभेचा कोणताही पुरावा अथवा कागदपत्र सादर न केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे कलम ३६ नुसार नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाने मान्य केले.
या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज मंजूर करत सरपंच डिमन गोवर्धन टोंगे यांना आदेशाचे दिनांक 17 फेब्रुवारी 2026 पासून पुढील कालावधीकरिता सरपंच पदावरून अपात्र घोषित केले. खर्चाबाबत कोणताही आदेश देण्यात आलेला नाही.
सदर आदेशाची प्रत उपजिल्हाधिकारी (ग्रामपंचायत निवडणूक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग), तहसीलदार मारेगाव व गटविकास अधिकारी यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.










