वणी टाईम्स न्युज: वणी शहर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर एका तरुणावर जीवघेणा हल्ल्याची घटना सोमवारी रात्री 11.30 वाजता दरम्यान घडली. किरकोळ वादातून तब्बल 8 ते 10 जणांनी काठ्या व लोखंडी रॉडने युवकाला बेदम मारहाण केली. अंकुश मोगरे, रा. सेवानगर वणी असे या हल्ल्यात गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी 8 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कशी घडली घटना ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत जखमी अंकुश मोगरे हा वरोरा मार्गावर ट्रॅव्हल्स पॉईंट जवळ पानठेल्यासमोर उभा असताना किरकोळ कारणावरून पान सेंटर चालकासोबत वाद निर्माण झाला. पाहता पाहता आरोपींनी संगनमत करून त्याच्यावर हल्ला चढवला. हातातील काठ्या व लोखंडी रॉडने डोक्यावर, पाठीवर व हातापायांवर अंधाधुंद प्रहार केले. जीव वाचवण्यासाठी तो पळून निघाला, मात्र आरोपींनी पाठलाग करून तहसील कार्यालयाजवळील नास्ता सेंटरसमोरच त्याला रस्त्यावर पाडले. त्याचवेळी आरोपी विशाल चौहान याने डोक्यावर वारंवार काठीने प्रहार करून “जिवे ठार मारण्याचा प्रयत्न” केला. या हल्ल्यात अंकुश गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
प्राणघातक हल्ला केल्याची फिर्यादी भोलेश्वर नारायण ताराचंद, रा. सेवानगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विलास चौहान, विशाल चौहान, सुर्यभान चौहान, विरसिंग उर्फ विरु लीवारे, दुर्गेश उर्फ सोनु चौहान, अथर्व उईके तसेच दोन अनोळखी आरोपी विरुद्ध भा.न्या.सं. कलम 109, 189(1)(2)(3)(4), 190, 191(1)(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करुन 6 आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार झाले.
सदर घटनेचा तपास ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनता पो.उपनिरीक्षक सुदाम आसोरे, पो.स्टे. वणी करत आहेत. घटनेनंतर परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून वणी शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.










