वणी टाईम्स न्युज | पोलीस असल्याचे सांगत दोन भामट्यांनी एका वृद्धाची दिशाभूल करून त्याच्याकडील सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली उघडकीस आली आहे. नांदेपेरा गावाजवळ शुक्रवारी घडलेल्या या घटनेत माजी नगरसेवक नितीन चहाणकर यांचे वडील शंकर मारोती चहाणकर (70), रा. रविनगर वणी यांची अंदाजे 40 हजाराने फसगत झाली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शंकर मारोती चहाणकर यांचे नांदेपेरा येथे शेत आहे. शुक्रवार 6 मार्च रोजी दुपारी ते आपल्या अँक्टिव्हा दुचाकीने शेताकडे जात असताना नांदेपेरा गावाजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. आम्ही पोलीस असल्याचे सांगत पुढे सोन्याची चोरी झाली असून तपास सुरू आहे, असे सांगून त्यांनी चहाणकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या हातातील अंदाजे ४० हजार रुपये किमतीची सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तपासासाठी घेऊन पाहण्याचा बहाणा केला.
दरम्यान, आरोपींनी काही क्षणांतच हातचलाखी करत मूळ सोन्याची अंगठी काढून तिच्या ऐवजी बनावट धातूची अंगठी पुडीत ठेवून चहाणकर यांच्या हातात दिली आणि तेथून पसार झाले. काही वेळाने चहाणकर शेतात पोहोचल्यावर त्यांनी पुडी उघडून पाहिली असता अंगठी बनावट असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत अशा प्रकारच्या भामट्यांपासून सतर्क राहण्याचे सांगितले आहे.










