वणी टाईम्स न्युज | शहरातील एका बारसमोरील किरकोळ वादाचे रूपांतर थेट हल्ल्यात झाल्याची घटना समोर आली आहे. बारसमोर झालेल्या वादानंतर काही वेळातच आरोपीने प्लास्टिकच्या खुर्चीने डोक्यावर वार करून तरुणाला जखमी केल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दाखल तक्रारीनुसार फिर्यादी अक्षय (32), रा. गाडगे बाबा चौक, वणी हे मंगळवार दि. 3 मार्च सायंकाळी सुमारे 4.30 वाजता ते आपल्या दोन मित्रांसोबत बाजार समिती समोरील आशा बारमध्ये दारूचे पार्सल घेण्यासाठी गेले होते. बार व्यवस्थापकाने आत येण्यास मनाई केल्यामुळे तिघ मित्र बाहेर उभे राहून संभाषण करत होते. दरम्यान त्यावेळी अंशु तांबे (28,) रा. वणी व त्याचा एक मित्र तेथे येऊन त्यांच्या संभाषणात हस्तक्षेप करू लागले. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये किरकोळ वाद झाला.
यानंतर अक्षय व त्यांचे मित्र दत्त मंदिराजवळील चिंतामणी कृषी केंद्राच्या गोडाऊन परिसरात बसून चर्चा करत असताना अंशु तांबे आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला. “बारमध्ये मला का बोललास?” असा सवाल करत त्याने जवळील प्लास्टिकच्या खुर्चीने अक्षय यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात अक्षय यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव झाला.
ब्रेकिंग: धारदार शस्त्रांसह दहशत माजविणाऱ्यांवर पोलिसांचा धडक एक्शन
दरम्यान, आरोपीसोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाने तेथे उभ्या असलेल्या मोटारसायकलवर दगड फेकून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अक्षय यांनी आपल्या मित्रांसह वणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली असून पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन आरोपी अंशू तांबे व त्याच्या एका मित्रावर कलम 118(1), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.










