जितेंद्र कोठारी, वणी :
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाकडून पारंपरिक उमेदवारांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती राबविण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मागील नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने बहुतांश जुन्या नगरसेवकांना डावलून नवीन उमेदवारांवर विश्वास दाखवला होता. त्या वेळी हा निर्णय धाडसी मानला गेला असला तरी मतदारांनी नव्या नेतृत्वाला पसंती दिल्यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले. त्यामुळेच हा “प्रयोग” यशस्वी ठरल्याचे पक्षातील कार्यकर्ते सांगत आहेत.
आता याच पद्धतीचा अवलंब जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये करण्याचा विचार पक्षात सुरू असल्याचे समजते. स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले युवा पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रात सक्रिय व्यक्ती आणि संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र अस्वस्थता वाढू लागली असून उमेदवारीवरून अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी गटबाजी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी पक्ष संघटन मजबूत असल्याचा दावा स्थानिक नेते करत आहेत.
अधिकृत स्तरावर कोणतीही घोषणा झालेली नसली तरी वणीतील राजकीय समीकरणांवर या संभाव्य निर्णयाचा मोठा परिणाम होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी काही दिवसांत उमेदवारी निकष स्पष्ट झाल्यास स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.










