वणी टाईम्स न्युज : शहरात एका ५ वर्षीय अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी युवक (30 वर्ष) यास अटक केली असून, त्याच्यावर ‘पोक्सो’ सह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालक आपल्या पालकांसोबत असताना त्याच्या वागण्यात अचानक बदल दिसून आला. पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, संबंधित आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून पीडित बालकाला बोलावून त्याच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याची बाब समोर आली. या धक्कादायक प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी तातडीने ‘डायल ११२’ वर संपर्क साधला. त्यानंतर वणी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास आरोपीला शास्त्री नगर परिसरातून ताब्यात घेतले. सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६५(२) तसेच पोक्सो (POCSO) कायदा कलम ४, ५ (L, M, N), ६ आणि १० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी या करत आहेत. अल्पवयीन मुलांवरील अशा वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.










