वणी टाईम्स न्युज : तब्बल सहा दिवसांपूर्वी कोणालाही न सांगता घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचा निर्गुडा नदीच्या रामघाट परिसरात झाडाझुडपात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. रविवार 8 मार्च रोजी ही घटना उघडकीस आली. समीर रमेश थोरात (22) रा. खरबाडा मोहल्ला वणी असे मृतक तरुणाचे नाव आहे.
समीर थोरात हा मागील सहा दिवसांपासून घरुन बेपत्ता होता. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे आणि इतर ठिकाणी शोध घेऊनही त्याचा काही सुगावा लागला नाही. शेवटी 7 मार्च रोजी समीर रमेश थोरात (22) हा बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी वणी पोलीस ठाण्यात नोंदवली.
दरम्यान 8 मार्च रोजी दुपारी नदी परिसरात गेलेल्या काही लोकांना झाडाझुडपात एक युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून पडला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटवली असता मृतदेह समीर थोरात याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करुन मृतदेह कुटुंबियांना देण्यात आले.
तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेल्या समीर थोरात यांनी आत्महत्येचा पर्याय का निवडला ? याबाबत कारण समोर आले नाही. पोलिसांनी मृतक समीर थोरात विरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.










