वणी टाईम्स न्युज | जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वणी शहरात कष्टकरी व गरजू महिलांच्या सन्मानार्थ एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. धनोजे कुणबी महिला विकास संस्था आणि शारदा उत्सव समितीच्या अध्यक्षा संगीता संजय खाडे यांच्या पुढाकाराने शहरातील कष्टकरी महिला, रुग्णालयातील माता-भगिनी तसेच लघु व्यवसाय करणाऱ्या महिलांना फळे व थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. स्वतःच्या हिमतीवर संसाराचा गाडा ओढणाऱ्या महिलांच्या कष्टाचा सन्मान करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.


कार्यक्रमाची सुरुवात वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शहरातील विविध ठिकाणी काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधत त्यांना फळे व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. यामध्ये ग्रामीण रुग्णालय परिसर, नगराळे हॉस्पिटल परिसर तसेच शिवाजी चौकातील भाजी विक्री करणाऱ्या महिला आणि रस्त्याच्या कडेला लघु व्यवसाय करून संसार चालवणाऱ्या श्रमजीवी महिलांचा समावेश होता. उन्हातान्हात काम करणाऱ्या या महिलांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला.
याशिवाय, शारदा उत्सव समितीच्या अध्यक्षा संगीता खाडे यांच्या पुढाकाराने सरकारी रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिला रुग्णांना फळे व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. तसेच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा शाल व पाण्याची बॉटल देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीतही स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या महिलांचा सन्मान करणे हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमास धनोजे कुणबी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा साधना गोहोकार, समिती सल्लागार किरण देरकर, वंदना आवारी, अर्चना बोधाडकर, कविता चटकी, साधना मत्ते, स्मिता नांदेकर, प्रमिला पावडे, हर्षा सपाट, वंदना बल्की, कांचन देरकर, रिता पहापळे, अर्चना पिदुरकर, वर्षा खाडे, शामा तोटावार, सीमा खाडे, सविता आवारी, सुरेखा ढेंगळे यांसह धनोजे कुणबी समाजातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वणी शहरात राबविण्यात आलेल्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.










