वणी टाईम्स न्युज : शहरातील विराणी हॉल परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास एका माथेफिरू व्यक्तीने लोखंडी सळई घेऊन अचानक हैदोस घातल्याची घटना घडली असून एका लहान मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मुलगा थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे बुधवारीच वर्धा येथे एका माथेफिरू युवकाने हल्ला करून दोन निष्पाप वृद्व इसमाची हत्या केली.
प्राप्त माहितीनुसार, एकता नगर मधील रहिवासी सदर व्यक्ती ही मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येत असून, ती मागील काही दिवसांपासून परिसरात मोकाटपणे वावरत होती. बुधवारी अचानक ती आक्रमक बनून लोखंडी सळई घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर धावून जात होती. याच दरम्यान, रस्त्यावर खेळत असलेल्या एका लहान मुलगा सलाखीच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मानसिक रुग्ण मोकाट अवस्थेत फिरत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी नमूद केले. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत ती व्यक्ती तिथून पसार झाला. दरम्यान, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मानसिक रुग्णांच्या देखरेखीबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.










