वणी टाईम्स न्युज : आढावा बैठकीसाठी सोमवारी वणी येथे आलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवित गोंधळ घालणाऱ्या शिवसेना (उबाठा) गटाचे 13 पैकी 12 जणांचे जामीन अर्ज न्यायालयाने रद्द करून त्यांची यवतमाळ जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. तर 1 शिवसैनिक दिलीप काकडे यांचे जास्त वय असल्यामुळे जामीन देण्यात आली. सदर प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात 23 अधिक अनोळखी 10 ते 12 जणांवर सोमवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते.
आंदोलनकारी व गुन्हे दाखल झालेले 23 जणांपैकी पोलिसाने शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे, तालुका प्रमुख संतोष कुचनकर, पुरुषोत्म बुटे, गणपत लेडांगे, दिलीप काकडे, राजू तुराणकर, दिवाकर कोल्हेकर, भगवान मोहिते, मनीष बत्रा, जगन जुनघरी, संकेत मोहिते, प्रेमानंद धानोरकर, मोहम्मद अन्सारी यांना रात्रीच अटक केली होती. तर गीता उपरे, सुधीर थेरे, संजय देठे, शरद ठाकरे, अजय कवरासे, दिवाकर सातपुते, विजय अवताडे, सचिन पचारे, रुबिता आवारी, मंगेश मोहितकर, देवा बोबडे व इतर अनोळखी आरोपी फरार आहे.

अटकेतील आरोपींना पोलिसांनी आज वणी न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने 13 पैकी 12 जणांची यवतमाळ कारागृहात रवानगी केली. तर दिलीप काकडे यांची जामीन मंजूर करण्यात आली. दरम्यान सर्व शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी. यासाठी शिवसेनेचे खासदार संजय देशमुख व आमदार संजय देरकर यांचे नेतृत्वात आज शिवसैनिकांनी जोरदार प्रदर्शन केले.










