वणी टाईम्स न्युज: वडिलांच्या मृत्यूनंतर आईने दुसरं लग्न केल्यामुळे गावात आजी आजोबांकडे राहत असलेली अल्पवयीन मुलगी 10 दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता मुलीची माजरी (कॉलरी) येथील आत्यांनी याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिची अल्पवयीन भाची किरण (बदललेले नाव) आजी आजोबांकडे वणी तालुक्यातील एका गावात राहत आहे. मागील 3 वर्षापासून तिचे राजूर कॉलरी येथील एक युवकासोबत प्रेमसंबंध आहे. दिनांक 24 सप्टेंबर रोजी आजी आजोबा कामानिमित्त वणी येथे गेले असता किरण घरी एकटीच होती. दरम्यान साडेतीन वाजता किरण आपल्या आजोबांची स्कुटी घेऊन राजुर कॉलरी येथे गेली. तेथे एका गॅरेजवर स्कुटी ठेवून “मी वणीला जात आहे” असे सांगून ती निघून गेली होती.

इकडे सायंकाळी घरी परत आल्यावर आजी आजोबांना त्यांची नात किरण दिसून पडली नाही. त्यांनी इकडे तिकडे व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. तसेच तिचा मोबाईल फोनही घरीच आढळला. शेवटी मुलीच्या आत्यांनी तिची अल्पवयीन भाचीला कुणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसाने अनोळखी व्यक्ती विरुद्ध कलम 137(2) BNS नुसार गुन्हा दाखल केला असून मुलीचे शोध सुरु आहे.










