वणी टाईम्स न्युज: वणी कडून तेलंगणा येथील आदिलाबाद कडे जाणाऱ्या तीनचाकी ऑटोला विरुद्ध दिशेकडून येणाऱ्या 16 चाकी ट्रकने जबर धडक दिली. वणी कायर मार्गावर मानकी गावच्या काही मीटर अलीकडे झालेल्या या अपघातात ऑटोमधील चालकासह 4 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपुर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणाच्या आदिलाबाद येथील काही प्रवासी ऑटो क्रमांक TS 01 AU 3160 मध्ये वणी येथून आदिलाबाद कडे निघाले होते. सायंकाळी 6 वाजता दरम्यान वणी येथून तब्बल 6 किमी अंतरावर मानकी गावच्या अलीकडे पुलावर समोरुन येणाऱ्या 16 चाकी ट्रक क्रमांक MH40 CT 7884 या ट्रकने ऑटोला धडक दिली. या अपघातात ऑटोचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. तर ऑटोमधील तेलंगणातील 4 प्रवासी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमीपैकीं गंभीर एका प्रवाशाला वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपुर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर ट्रक व ऑटो पोलिसाने जप्त करून ठाण्यात आणले आहे.










