वणी टाईम्स न्युज : येथील साहित्य व शैक्षणिक चळवळीचे केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची एकमताने निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष माधवराव सरपटवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड सर्वानुमते झाली.

1874 साली इंग्रजकालीन शासनात स्थापन झालेले हे ‘अ’ वर्ग वाचनालय सार्धशतीकडे वाटचाल करीत असून, परिसरातील वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम राबविते. नवोदित तसेच ख्यातनाम वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम वाचनालय सातत्याने करत आहे.
वाचनालयात 27 हजारांहून अधिक ग्रंथसंपदा, राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रे व मासिके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. दरवर्षी 40 दिवाळी अंक फक्त 300 रुपये वार्षिक शुल्कात सदस्यांना मिळतात. स्पर्धापरीक्षांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी 30 रुपये मासिक वर्गणी घेत संबंधित सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. दररोज 40 ते 50 विद्यार्थी अभ्यासिकेत उपस्थित राहून अभ्यास करतात.
नगर वाचनालयाच्या उभारणीसाठी आणि वैभव वृद्धीसाठी प्राचार्य राम शेवाळकर, स्वातंत्र्यसैनिक नानाजी भागवत, रतनलाल जयस्वाल, डॉ. दिनकर मंगदे आणि माधवराव सरपटवार यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. नवीन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 7 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष विशाल झाडे, सचिव गजानन कासावार, संचालक हरिहर भागवत, प्राची पाथ्रडकर तसेच कर्मचारीवर्ग उपस्थित होते.










