वणी टाईम्स न्युज : पोलीस दप्तरी सराईत गुन्हेगार म्हणून नोंद येथील मोमिनपुरा निवासी जहीर उर्फ जम्मू मेहबूब खान याला महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक क्रियाकलाप अधिनियम 1981 (MPDA act) मध्ये अटक करण्यात आली असून त्याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जम्मू खान याला 12 महिने स्थानबद्ध करण्याचा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा आदेश शासनाने कायम केला आहे. सदर कार्यवाही बाबत यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे प्रेस नोट जारी करुन माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी यांनी तयार करून पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्फतीने मंजुरी करिता जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सादर केला होता. सदर प्रस्तावास जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांनी दिनांक 9 जून 2025 रोजी मान्यता देऊन जमीर उर्फ जम्मू खान मेहबूब खान रा. मोमीनपुरा वणी, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ याचे स्थानबद्धतेचे आदेश पारित केले.
आणखी कारवाया करणार ..
यापुढेही अशा स्वरुपाचे शांतता भंग करणारे, शरीराविरुध्द व संपत्तीविरुध्द गुन्हे करणारे, धोकादायक गुन्हेगार तसेच वाळु तस्करी, गावठी हातभट्टी दारु विषयक गुन्हेगारांविरुध्द एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत जास्तीत जास्त कारवाई करण्यासाठी अशा गुन्हेगारांची जंत्री गोळा करणे सुरु असुन भविष्यात अशा प्रकारच्या जास्तीत जास्त कारवाई प्रस्तावीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई..
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी गणेश केंद्रे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वणी गोपाल उंबरकर व पीएसआय धीरज गुल्हाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
संबंधित बातमी –
ब्रेकिंग: जम्मू उर्फ जमीर खान याला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक










