जितेंद्र कोठारी, वणी : ‘सरकारी काम आणि चार दिवस थांब’अशी मराठी म्हण आहे. मात्र त्यावरही जाऊन बांधकाम विभागाने ‘रस्त्याचे काम आणि चार महिने थांब’ची उक्ती आत्मसात केल्याचे दिसत आहे. रस्त्यावर अपघात होऊन एकाद्या माणसाचा जीव जात नाही, तोवर बांधकाम विभागाला जाग येत नाही. याचे प्रत्यक्ष उदाहरण शहरातील नांदेपेरा मार्गावर निर्माणधीन सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम आहे.
साई मंदिर ते रेल्वे क्रॉसिंग पर्यंत तब्बल 5 कोटीच्या निधीतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. रस्त्याची एक बाजू पूर्ण होऊन 2 महिने झाले. या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे मध्ये येणारे इलेक्ट्रिक पोल व डिपी न काढता रस्ता बांधकाम करुन वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु जगन्नाथ बाबा मठासमोर रस्त्याच्या मधोमध असलेला एक वीज खांब मृत्यूचा खांब बनून भयंकर अपघाताची वाट बघत आहेत. सुदैवाने अनेक वाहने या खांबावर धडकण्यापासून थोडक्यात बचावले आहे.
रस्त्यावर असलेले हे मृत्यूचे खांब हलविण्याकरिता अनेकदा संबंधित कंत्राटदार व बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली. मात्र दोन्ही एकमेकावर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहे. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर इलेक्ट्रिक पोल, डिपी शिफ्टिंग करण्यासाठी वणी येथील बिलोरिया नामक कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले आहे. परंतु अजूनही कंत्राटदाराने पोल शिफ्टिंगचा काम सुरू केलेलं दिसत नाही.
रस्त्यातील खांबामुळे भयंकर अपघात होण्याची शक्यता असताना कंत्राटदार व बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा व लापरवाही कुणाच्या जीवावर बेतणार हे सांगता येत नाही. किंबहूना बांधकाम विभाग एकाधा अपघात होण्याचीच वाट बघत असेल..!










