वणी टाईम्स न्यूज : स्थानिक नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या दारुण पराभवानंतर पक्षाचे नेते विजय चोरडिया यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावरील पोस्ट करीत विजय चोरडिया यांनी वणीतील जनतेचा निर्णय स्वीकारला आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या मतदारांचे आभारही मानले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की स्थानिक नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली असताना निवडणुकीत पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही. नगराध्यक्षसह त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. वॉर्ड क्रमांक १० (ब) मधून चोरडिया कुटुंबाचे जावई अक्षय बोथरा यांची जागाही पक्षाला राखता आली नाही. भाजपचे उमेदवार अनिल लाभचंद चिंडालिया यांनी अक्षय बोथरा यांचा ६४९ मतांनी पराभव केला.

विजय चोरडिया यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या जाण्याच्या काही दिवसांनंतर त्यांचे पुत्र आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष अधिवक्ता कुणाल चोरडिया यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपचा राजीनामा दिला आणि शिवसेनेत सामील झाले. शिवसेनेचे वणी विधानसभा मतदारसंघाचे नेते आणि जिल्हाप्रमुख, माजी आमदार विश्वास नांदेकर आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी विजय चोरडिया यांच्या खांद्यावर आली.
नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने नगराधक्ष पदासह सर्व २९ नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले. पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु. पायल तोडसाम हिला ४,३५१ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कोणत्याही प्रभागात शिवसेना (शिंदे) उमेदवार त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला थेट लढत देऊ शकला नाही व निवडणुकीत पक्षाचा पानिपत झाला. या निकालामुळे वणी विधानसभेत शिवसेना (शिंदे) पक्षाच्या राजकीय भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.










