वणी टाईम्स न्युज : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात विविध पक्षांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निलजई, तरोडा बेलोरा परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवार 21 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.
गेल्या काही आठवड्यांपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक पवित्रा घेत असून आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. या भूमिकेचा थेट परिणाम स्थानिक राजकारणावर होताना दिसत आहे. त्यामुळे भाजप महायुती बॅकफूटवर गेल्याची राजकीय पृष्ठभूमी असतानाच झालेला हा पक्षप्रवेश हा सत्ता पक्षासाठी धक्का म्हणून पाहिला जात आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात महेंद्र हरी राखुंडे, अनिकेत सुधाकर कुमरे, अमोल गुरुदेव तितरे, अमोल यमपल्लीवार, महेंद्र बावणे, पांडुरंग जेऊरकर, अमोल सोनटक्के, शकीस घिमे, युगल घिमे, सोपान कांबळे, सौरभ आसुटकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश झाला. कार्यक्रमास जिल्हाप्रमुख संजय निखाडे, उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे, सतीश वऱ्हाटे, दिवाकर भोंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकांच्या दारात असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा पक्षप्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्थानिक स्तरावर मोठी बळकटी देणारा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.










