वणी टाईम्स न्युज : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर राज्य सरकारला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचं शिक्षण बंधनकारक करण्यात आलं होतं. पण राज ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध केला. महाराष्ट्रात केवळ मराठी भाषेचीच सक्ती असावी. तसेच आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाहीत, असं राज ठाकरे रोखठोकपणे म्हणाले होते.

राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत तर याबाबतचा जीआर फाडला होता. अखेर हिंदी भाषेला होत असलेला विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय स्थगित केला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी याबाबत विधानसभेत माहिती दिली.

शिक्षण मंत्र्याच्या या घोषणेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वागत केले आहे. मनसेच्या भूमिकेमुळेच सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला, म्हणून वणी येथे मनसे कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौक येथे आतिषबाजी करून तसेच राज ठाकरे यांच्या नावाची घोषणाबाजी विजयोत्सव साजरा केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आरोग्य सभापती धनजंय त्रिंबके, मा. तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, शहर उपाध्यक्ष मयुर घाटोळे, मयुर गेडाम, अमोल मसेवार, शंकर पिंपळकर, गोविंदराव थेरे, परशुराम खंडाळकर, विलन बोदाडकर सह अनेक मनसे कार्यकर्ता उपस्थित होते.










